ढाळीची बांधबंदिस्ती
मृदसंधारणाच्या ज्या अभियांत्रिकी उपाययोजना आहेत त्या अत्यंत खर्चिक असून त्यांचे परिणामही कालांतराने दिसून येतात. यासाठी कमी खर्चिक व लवकर परिणाम देणारी उपाययोजना म्हणून जैविक बांधाचे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. जैविक बांध म्हणजेच मातीच्या किंवा दगडाच्या बांधाएवढी समपातळी रेषेवर गवत किंवा घायपात यासारख्या वनस्तींची घट्ट लागवड करून भूपृष्ठावरुन वाहणाऱ्या पाण्यास अडथळा निर्माण करणे की, जेणेकरून पाण्याबरोबर येणाऱ्या मातीचे कण या ठिकाणी अडतील व स्वच्छ पाणी त्या बांधातून संथपणे वाहून जाईल. पाणी या वनस्पतीच्या जाळ्यातून वाहून जाऊ शकत असल्यामुळे या बांधास विशिष्ट प्रकारच्या सांडव्याची किंवा बांधास ढाळ देण्याची आवश्यकता रहात नाही. मातीच्या बांधाप्रमाणे हे बांध वाहून जाण्याची किंवा फुटण्याची शक्यता नसल्याने ते कोणत्याही प्रकारच्या तीव्र उताराच्या जमिनीवरदेखील घालता येतात. मृदसंधारणाचा हा एक स्वस्त व प्रभावी उपाय आहे.