बंद

    ओघळ नियंत्रणाचे उपचार

    अनघड दगडाचे बांध

    ओघळीचे रुपांतर लहान नाल्यात झाल्यानंतर त्यातून वाहणाऱ्या पाण्याचा वेग वाढतो व नाला धुपाचे प्रमाण वाढते व परिणाम जास्त होतो अशा ठिकाणी शेतातील दगड गोळा करून त्याचा नाल्याच्या रुंदीएवढा बांध घालण्यात येतो या बांधासाठी नाल्याच्या पात्रात पाया खोदावा लागतो यामुळे दगडांना बळकटी येते. दगड रचताना ते पडू नयेत यासाठी बांधाला दोन्ही बाजूनी उतार देण्यात येतो अशा दगडाच्या बांधाची संख्या, ओघळीची लांबी उतार व शेत परिस्थितीप्रमाणे ठरविण्यात येते.

    गॅबीयन बंधारा

    दिवसेंदिवस भूगर्भातील पाण्याचा साठा कमी होत चालला आहे. पाणलोटात पडलेले पावसाचे पाणी हे जे अपधावेच्या स्वरूपात वाहून जाते ते योग्य उपचाराद्वारे जागोजागी अडविणे व जिरविणे महत्वाचे आहे. परंतु काही भागात सांडव्यासाठी योग्य जागा मिळत नसल्यामुळे मातीचे बांध घालणे शक्य होत नाही. तर पक्का पाया मिळत नाही म्हणून सिमेंट बांध बांधता येत नाही अशा भागांसाठी गॅबीयन स्ट्रक्चरचे बांधकाम सोपे व कमी खर्चाचे आहे. यामुळे अपधावेचा वेग कमी होऊन जमिनीची धूप थांबविण्यास भूगर्भात पाणी मुरण्यास मदत होते. गॅबीयन स्ट्रक्चर म्हणजे अनघड दगडाच्या जाळीच्या गुंडाळ्यात नालापात्रात घातलेला आडवा बांध होय. ही कामे 1992 मध्ये राष्ट्रीय पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत सुरू करण्यात आली. परंतु सदर कामाची उपयुक्तता विचारात घेऊन सदरची कामे इतर पाणलोट उपचाराप्रमाणे तांत्रिकदृष्ट्या योग्य जागेची निवड करून जलसंधारणाचा हा नियमित उपचार म्हणून राबविण्यास शासनाने आता मान्यता दिलेली आहे.

    ज्या ठिकाणी नाल्याचा उतार 3 टक्के पेक्षा जास्त आहे तसेच पर्जन्यमान जादा असल्यामुळे लुज बोल्डर स्ट्रक्चर टिकत नाही. अशा ठिकाणी मृदसंधारणासाठी नवीन गॅबियन स्ट्रक्चरसाठी 500 मायक्रॉन जाडीची जिओमेंबरन पॉलीथिन फिल्म बसविणेसाठी शासनाने मान्यता दिलेली आहे

    मातीचे नाला बांध

    मातीच्या नाला बांधाची कामे राज्यात 1969 पासून सुरू करण्यात आली. सुरुवातीला ही कामे अवर्षण प्रवण क्षेत्रापुरती मर्यादित होती. नंतरच्या कालावधीत भूपृष्ठाखालील पाण्याच्या पातळीत वाढ करण्याच्या दृष्टीने या कामाची व्याप्ती वाढून राज्याच्या सर्व जिल्ह्यांत ही कामे हाती घेण्यात येत आहे. या कामासाठी जागा निवडीची मार्गदर्शक तत्वे खालीलप्रमाणे आहेत.

    • नाल्याच्या तळाचा उतार 3 टक्केपेक्षा जास्त नसावा.
    • नाल्याचे पाणलोट क्षेत्र कमीत कमी 40 हे. व जास्तीत जास्त 500 हे. असावे.
    • नाल्याची रुंदी 5 मी. पेक्षा कमी व 15 मी. पेक्षा जास्त असू नये.
    • अतिरिक्त जादा पाणी बाहेर काढून देण्यासाठी नाल्याच्या बाजूला कठीण मुरुम असावा.

    मातीच्या बांधामध्ये सर्वसाधारणपणे जास्तीत जास्त 4 मी. उंचीचा पाणीसाठा केला जातो. मातीच्या नालाबांधामुळे भूगर्भातील पाणीसाठ्यात वाढ होवून जवळपासच्या पाण्याच्या पातळीत वाढ होते असे मूल्यमापन अहवालावरून दिसून आले आहे.

    सिमेंट नाला बांध

    पाणलोट आधारित नाला उपचारामध्ये सिमेंट नाला बांध उपचारास अनन्य साधारण महत्व आहे. ज्या ठिकाणी मातीचे नाला बांध घेण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या योग्य जागा उपलब्ध नाही अशा ठिकाणी सिमेंटचे नाला बांध बांधून पाणीसाठा केला जातो. यामुळे भूपृष्ठामध्ये पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास मदत होवून नाल्यालगतच्या विहीरींच्या पाणी पातळीमध्ये लक्षणीय वाढ होत असते. पर्यायाने विहीरीखालील बागायती क्षेत्रामध्ये वाढ होते. या सर्व बाबींचा साकल्याने विचार करून महाराष्ट्र शासनाने सन 2011-12 पासून राज्यातील टंचाईग्रस्त जिल्ह्यांमध्ये पाणलोट आधारित उपचाराबरोबरच एकेरी पद्धतीने सिमेंट नालाबांधाचा उपक्रम हाती घेतलेला आहे. यासंदर्भात सुधारित मार्गदर्शक सूचना शासन निर्णय दिनांक 23 मार्च 2017 व 08 ऑगस्ट, 2018 अन्वये निर्गमित केल्या आहेत. सदर बाबत आर्थिक मापदंड शासन पत्र क्र. संकिर्ण-2021/प्र-क्र.232/जल-1, दि.11/2/2022 मधील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे (साठवण क्षमता 150 स.घ. मी. पेक्षा कमी) चे वापरण्यात येत आहेत.

    वळण बंधारा

    ज्या पाणलोट क्षेत्रामध्ये सर्वसाधारणपणे डिसेंबर अखेरपर्यंत ओढ्याला पाणी टिकते व सर्वसाधारणपणे 150 लि. प्रतिसेकंद पाणी वाहते अशा नाल्यावर 1 मी. उंचीचे सिमेंटचे पक्के बांध घालून हे पाणी समपातळीमध्ये बाजूच्या शेतात वळविले जाते. भातखाचरांना सतत पाणी लागत असल्यामुळे नाल्याचे पाणी ढाळाने भातखाचरात वाहून नेण्यासाठी चराचा अवलंब केला जातो. ज्या नाल्याला वरील पाणलोट क्षेत्रात फारच कमी पाऊस पडतो व तो नाला फक्त पावसाळ्यात वाहतो व इतर वेळेस कोरडा पडतो या ठिकाणी या उपचाराने प्रवाही सिंचनाखाली क्षेत्र आणता येते. ही कामे 1990-91 वर्षात सुरू करण्यात आली.